उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर प्रमाणेच उरुळी कांचनसाठीही स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे, हे येथील ग्रामस्थांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा (ग्रामिण) पोलीस अधिक्षक कार्यालयात उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्याबाबतच्या हालचाली सुरु झाल्या असून, गणेशोत्सवानंतर म्हणजेच एक ऑक्टोबरपासून उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे कामकाज सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा (ग्रामिण) पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनीही गणेशोत्सवानंतर कोणत्याही क्षणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे कामकाज सुरु होण्याच्या शक्यतेस दुजोरा दिला आहे. नियोजित पोलीस स्टेशनमध्ये काम करु इच्छिणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अर्ज पोलीस अधिक्षक कार्यालयाने मागवल्याची माहिती अंकीत गोयल यांनी “पुणे प्राईम न्यूज”ला दिली.
उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, असे स्वप्न उरुळी कांचनचे ग्रामस्थ मागील २०-२५ वर्षांपासून पाहत आहेत. याबाबतचा प्रस्तावही मागील काही वर्षांपासून शासन पातळीवर प्रलंबित आहे. मात्र, या प्रस्तावाला आता गती आली असून, नजीकच्या काळात उरुळी कांचनमध्ये नवीन पोलीस स्टेशन अस्तित्वात येणार आहे. नियोजित उरुळी कांचन पोलीस स्टेशनमुळे लोणी काळभोर पोलीस स्टेशनवरील मोठा भार कमी होणार आहे. शिवाय उरुळी कांचन व परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण राहण्यास मदत होणार आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनची हद्द बदलणार…
नियोजित उरुळी कांचन पोलीस स्टेशन अस्तित्वात येणार असल्याने, लोणी काळभोर पोलीस स्टेशनची हद्द मागील काही वर्षांच्या काळात तिसऱ्यांदा बदलणार आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन हे क्षेत्रफळाच्या दृष्ट्रीने विचार केल्यास २० वर्षांपूर्वी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वांत मोठे व प्रतिष्ठेचे पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जात होते. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढव्याजवळील खडी मशीन चौकापासून, दिवेघाट, उरुळी देवाची, फुरसुंगी, मांजरी खुर्द, वाघोली लोणीकंद ते शिंदेवाडी, अष्टापूर, उरुळी कांचन अशा मोठ्या परिसराचा समावेश होता.
काही वर्षांपूर्वी लोणी काळभोरमधून मुळा-मुठा नदीपलिकडची गावे तोडून त्यांच्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. तर फुरसुंगी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक ही गावे हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे अस्तित्व उरुळी देवाची, लोणी काळभोर व उरुळी कांचन असे मर्यादीत राहिले होते. त्यातूनही येत्या काही दिवसांत उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस स्टेशन होणार असल्याने, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचा रुबाब कमी होणार आहे.
उरुळी कांचन व परिसरातील गुन्हेगारीमध्ये वाढ
उरुळी कांचन व परिसरातील गावांमध्ये मागील काही वर्षांपासून नागरिकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर वाढत्या नागरिकरणाबरोबरच उरुळी कांचन हद्दीतील गुन्हेगारीमध्ये जबरी वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण ठेवताना लोणी काळभोर पोलीस यंत्रणेला मोठ्या अडचणी येत होत्या. नागरिकरणाचा वाढता आलेख व त्या प्रमाणात पोलीस बळ नसल्याने या भागात गुन्हेगारीचा आलेख वाढतच राहिल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन व स्वतंत्र अधिकाऱ्यांची गरज भासू लागली होती. ही गरज आता नियोजित पोलीस स्टेशनमुळे पूर्ण होणार आहे.
नियोजित उरुळी कांचन पोलीस स्टेशनची संभाव्य हद्द…
उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत उरुळी कांचन या प्रमुख शहरासह सोरतापवाडी, नायगाव, पेठ, शिंदवने, तरडे, वळती, भवरापूर, कोरेगाव मूळ ही गावे असणार आहेत. लोकसंख्येचा विचार केल्यास उरुळी कांचन व सोरतापवाडी ही दोन प्रमुख गावे असणार आहेत. तर लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाचीसह उरुळी देवाची हद्दीतील दहाहून अधिक गावे असणार आहेत.
उरुळी कांचन पोलीस स्टेशन लवकरच सुरू होणार : अंकीत गोयल
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा (ग्रामिण) पोलीस अधिक्षक अंकीत गोयल म्हणाले की, जिल्हा (ग्रामिण) पोलीस दलाच्या अखत्यारीत उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत. नियोजित उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये काम करु इच्छिणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातून उरुळीकांचन व संबंधित पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी गावे वगळण्यासाठी शहर पोलीस दलाशी संपर्क साधण्यात आला आहे. उरुळी कांचन पोलीस स्टेशन सुरु होण्याची नेमकी तारीख सांगता येणार नसली तरी ते लवकरच सुरु होईल.
उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस स्टेशन ही आनंदाची बातमी : सरपंच भाऊसाहेब कांचन
उरुळी कांचनचे विद्यमान सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले की, उरुळी कांचन व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु होणार ही नागरिकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. मागील काही वर्षांपासून याबाबत सर्वजण पाठपुरावा करत होते. परिसरातील नागरिकरणाचा वाढता आलेख व त्या प्रमाणात पोलीस बळ नसल्याने, या भागात गुन्हेगारीत वाढ होत होती. नवीन पोलीस स्टेशन झाल्यानंतर, याठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने, त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यावर होणार आहे.