पुणे : मुलगी घरात देखील सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सावत्र बापाने १९ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची घटना हवेली तालुक्यातील बकोरी गावात घडली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, हा प्रकार जुलै २०२३ ते १७ मार्च २०२४ या कालावधीत पिडितेच्या घरात घडला. याप्रकरणी १९ वर्षीय पीडित मुलीने मंगळवारी (ता. १९) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन येरवडा परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय सावत्र बापावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने आरोपीसोबत दुसरा विवाह केला आहे. विवाहानंतर आरोपी पीडित मुलीवर वाईट नजरेने पाहत होता. सावत्र बापाने मुलीशी अश्लील चाळे करून शारीरिक सुखाची मागणी केली. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
नराधम बाप एवढ्यावरच न थांबता, याबाबत आईला सांगितले तर तुला व तुझ्या आईला मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली. दरम्यान, फिर्यादी तरुणीचे लग्न जमले. यावरुन आरोपीने फिर्यादीच्या आईला लग्न कोणी ठरवले, असे बोलून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.