दीपक खिलारे
इंदापूर : राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र राज्य (पुणे) क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत जालना येथे राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या संघाने केले होते.
या स्पर्धेत श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर प्रशालेच्या १७ वर्षे वयाच्या मुलांच्या संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. बेसबॉल संघाचा कॅप्टन कृष्णा सुर्वे आणि तनिष्क शेलार या दोन खेळाडूंची बिलासपूर (छत्तीसगड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संस्थेचे संचालक तुकाराम जाधव, माजी पंचायत समिती सभापती नारायण वीर तसेच संस्थेचे सचिव मनोहर चौधरी यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. या वेळी उपमुख्याध्यापक दादासाहेब चौधरी, पर्यवेक्षिका शेख आणि सर्व खेळाडूंचे पालक उपस्थित होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला खेळाडूंचा सत्कार…
जालना येथे झालेल्या बेसबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या विजेत्या संघातील खेळाडू, क्रीडा शिक्षक स्वप्नील गलांडे, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सोरटे यांचा सत्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला. या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.