इंदापूर : उरण ची घटना ताजी असतानाच आता इंदापूर तालुक्यात देखील थरकाप उडवणारा प्रकार घडल्याने मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नजर ठेवत थेट तिच्या घरी जाऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न एका शाळेतील कारकूनाने केला होता. संबंधित मुलीने या कारकूनास प्रतिकार केल्याने आरोपीने तिला कीटकनाशक औषध पाजून बळजबरी केली आहे.
हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.28 जुलै) पुण्याच्या इंदापूर तालुक्यात घडला. अकलूजमधील खाजगी रुग्णालयात या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान आज या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
रणजित जाधव असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपी विरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आता मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या आरोपी विरोधात पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी रणजित जाधव याने आपल्या घरी येऊन अंगलगट करण्याचा प्रयत्न केला, बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यास आपण प्रतिकार केला आणि याच वेळी रणजीत जाधव याने आपल्याला कीटकनाशक पाजलं अशी फिर्याद देखील पोलिसांनी दाखल केली आहे.