इंदापूर : शहरातील शाळा कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेवर इंदापूर पोलिसांनी छापा टाकला. कॅफेच्या मालकासह कॅफेत आढळून आलेल्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई वैभव रवींद्र गरड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना कॅफेचालक हे कॅफेमध्ये कप्पे करून महिला व पुरुष ग्राहकांना एकत्र बसण्यासाठी परवानगी देतात, अशी माहिती मिळाली. त्यानंतर कोकणे यांनी तात्काळ हवालदार नितीन तांबे, लक्ष्मण साळवे, सुनील कदम, महिला पोलिस कर्मचारी सुरेखा निमगिरे, काजल शेळके यांच्यासह छापा मारीत स्टार कॅफे चालक अभिजीत दत्तात्रय लोकरे (रा. पडस्थळ), कॅफे क्रन्च चालक संकेत मारुती माने (रा.पारेकरवस्ती वनगळी), स्माईल कॅफे चालक सुहास कृष्णदेव खामगळ (रा. रामवाडी, वडापुरी) यांनी त्यांच्या कॅफेमध्ये कप्पे तयार केलेले होते.
यावेळी कॅफेमध्ये असलेल्या पाच जणांसह तिन्ही मालकांना ताब्यात घेऊन नोटीस देत पुढील कार्यवाही केली. तर त्या ठिकाणच्या महिला, मुली पोलीस आल्याचे पाहून निघून गेल्या, अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.