दीपक खिलारे
इंदापूर Indapur News : तालुक्यातील गोखळी गावातील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर उड्डाण पुल ( भुयारी मार्ग) करण्याच्या मागणीसाठी नागरिकांने रास्ता रोको आंदोलन केले.
विद्यार्थी संख्या १८०० ते २००० चे दरम्यान
गोखळी गावातील लोकसंख्या २००० ते २२०० आहे. अनेक लोक व्यवसाय, मजुरी निमित्त बाहेरगावी ये-जा करत असतात. तसेच गावातील वृध्द महिला व पुरुष यांनाही रस्ता ओलांडत असताना अपघात होवून त्यांच्या जीवितास धोका होवू शकतो. शिवाय गोखळी गावात गुरुकुल विद्यामंदिर असून या विद्यालयाची विद्यार्थीसंख्या १८०० ते २००० चे दरम्यान आहे.
आसपासच्या गावातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. इंदापूर बारामती मार्ग हा प्रचंड वाहतूकीचा मार्ग असून या ठिकाणी प्रशासनाला विनंती करुनही उड्डाण पुल ( भुयारी मार्ग) निर्माण करण्यात आला नाही. भविष्यात यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणच्या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख संजय सोनवणे, धनगर ऐक्य परिषदेचे डॉ. शशिकांत तरंगे, गुरुकुल विद्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणवळ, गुरुजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, माऊली वाघमोडे, बाळासाहेब चितळकर यांसह गोखळी व तरंगवाडी येथील सर्व ग्रामस्थ व विद्या मंदिर गोखळी येथील सर्व पालक रास्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी उड्डाणपूलाची प्रखर मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.