दीपक खिलारे ; इंदापूर
Indapur News : इंदापूर, (पुणे) : इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. तर चोरलेल्या दुचाकी विकत घेणाऱ्या एकालाहि ताब्यात घेतले असून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीच्या ७ लाख रुपयांच्या २१ मोटारसायकल त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. (Indapur News)
विनोद महादेव पवार (वय २४, रा. सरस्वतीनगर इंदापूर), अतुल मारूती काळे (वय १९, रा. निमगाव, ता. माढा, जि. सोलापूर) अशी दुचाकी चोरांची नावे आहेत. तर चोरलेल्या दुचाकी खरेदी करणाऱ्या योगेश मच्छिंद्र सुरवसे, (वय ३२, रा. बार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना गुन्हे शोध पथकास दिल्या होत्या.
सदर दुचाकी चोरींच्या घटनेचा पोलीस तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाने पोलीस ठाणे अभिलेखावरील मोटारसायकल चोरी करणारे आरोपी तसेच इंदापूर शहर परिरातील अनेक सी. सी. टि. व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासुन तांत्रिक माहिती वरून दोन संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी त्यांचे नाव विनोद पवार व अतुल काळे असे सांगितले. त्यांच्याकडे चौकशी केली असता इंदापूर, टेंभूर्णी, कुर्डवाडी, फलटण परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानी चोरी केलेल्या दुचाकी या त्यांचा साथीदार योगेश सुरवसे यास विक्री केल्या असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यालाहि ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी ७ लाख रुपयांच्या २१ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
सदरची कामगिरी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस हवलदार नंदू जाधव, गजानन वानोळे, होमगार्ड लखन झगडे यांनी केली आहे.