दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी तालुक्यातील बेकायदेशीर खडी क्रशर विरोधात डेरा आंदोलन पुकारले होते. या आंदोलनास प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सोमवारी (ता. १८) सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या दिवशी तालुक्यातील जनतेला आंदोलनाचा हाय होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
इंदापुरात आंदोलनांचा ‘हाय होल्टेज ड्रामा’
जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने इंदापूर तालुक्यातील एन.पी. इन्फ्रा कंपनी व तसेच तालुक्यातील इतर विनापरवाना खडी क्रशर विरोधात डेरा आंदोलन करण्यात येणार होते. या आंदोलनास विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर तालुक्याच्या पाच टीएमसी पाण्यास विरोध करणाऱ्यांविरोधात तसेच तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर केलेल्या आरोपांविरोधात आंदोलन करण्यात आले. (Indapur News) या वेळी आंदोलकांकडून भरणे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनस्थळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संजय सोनवणे यांनी पाठिंबा दिला. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) आंदोलनानंतर तहसील कार्यालयावर जनशक्ती शेतकरी संघटनेचेही आंदोलन होणार होते. संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा ताफा इंदापूर येथे येण्यासाठी निघाला होता. वाटेतच पुणे-सोलापूर महामार्गावरील भीमानगर-रांझणी (ता. टेंभुर्णी) येथे दुपारी दोनच्या सुमारास पोलीस प्रशासनाकडून ताफा अडवण्यात आला. (Indapur News) या वेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडले व आमदार भरणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनावेळी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
काठी नव्हे दांडा…!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे हातात घेतले होते. (Indapur News) या वेळी नागरिकांचे लक्ष झेंड्याच्या काठीकडे वेधले गेले. आपसूकच त्यांच्या तोंडून ही काठी नव्हे, दांडा… असे शब्द उमटले.
निवेदन स्विकारण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार परजिल्ह्याच्या सीमेवर
जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर डेरा आंदोलन करण्यात येणार होते. आंदोलनकर्ते आंदोलन स्थळी जाण्यास निघाले असता सोलापूर जिह्याच्या सीमेवरच त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यामुळे तेथेच आंदोलनकर्त्यांकडून ठाण मांडून आंदोलन करण्यात आले. (Indapur News) आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी इंदापूरच्या तहसीलदारांना परजिल्ह्याच्या सीमेवर यावे लागले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : निरा भिमा कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ संपला, कारखाना सुस्थितीत : हर्षवर्धन पाटील