दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : शस्त्रक्रियेसाठी गरजेचे साहित्य आणि आवश्यक बाबींची उपलब्धता नसताना देखील एका गरजवंत रुग्णाच्या उजव्या हातावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणारे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद क्षीरसागर, डॉ. हाके आणि डॉ. सुहास शेळके यांचा राष्ट्र सेवा दलाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता. ३) ही शस्त्रक्रिया पार पडली. त्या अनुषंगाने संबंधित डॉक्टरांच्या सन्मानार्थ राष्ट्र सेवा दलाच्या वतीने शुक्रवारी (ता. ४) हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. (Indapur News) या सोहळ्याप्रसंगी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार उपस्थित होते. या वेळी मुक्ताई ब्लड बँकेचे डॉ. ननवरे यांचाही विषेश सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन भिसे, गणेश टुले, अजीम तांबोळी, ब्रदर अंकुश यांच्यासह रुग्णालयातील परिचारिकांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्य संघटक गफूर सय्यद यांनी केले. तर सूत्रसंचालन पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रमेश आबा शिंदे यांनी केले. सेवा दल मंडळ सदस्य प्रा . कृष्णाजी ताटे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपक चोरमले यांनी आभार मानले. (Indapur News) या कार्यक्रमासाठी राष्ट्र सेवा दल सैनिक हमीद आतार, निवृत्त शिक्षक महादेव चव्हाण, शरद मोरे, दत्ता जगताप, शिवाजी पवार, संतोष जामदार यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोना काळात हजारो रुग्णांना सेवा देणारे, वेळप्रसंगी मृतांना खांदा देणारे डॉ. सुहास शेळके यांची नुकतीच दौंड येथील शासकीय रुग्णालयात बदली झाली. त्यांनी आजवर दिलेल्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. संबंधित रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी विशेष परिश्रम घेऊन सर्व यंत्रणेचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली होती.
याप्रसंगी बोलताना इंदापूर येथील तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेची माहिती घेण्यासाठी मी जाणीवपूर्वक काही लोकांना पाठवत असतो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या व उपचार घेण्यास सांगून रुग्णालयात चाललेल्या कामाची माहिती घेत असतो. प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांचे चांगले संबंध हे चांगल्या कामासाठी उपयोगी पडतात.
हाडांशी संबंधित शस्त्रक्रिया रुग्णालयात होणे गरजेचे
इंदापूर हे पुणे सोलापूर महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी आहे. याच महामार्गावर भिगवण-टेंभूर्णी दरम्यान अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. (Indapur News) अपघातातील बहुतेक जखमींना उपचारार्थ इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या हाडांशी संबंधित शस्त्रक्रिया रुग्णालयात होणे गरजेचे आहे. रुग्णालयात तसा विभाग आणि आवश्यक गरजांची पूर्तता झाल्यास अपघातग्रस्तांसह तालुक्यातील हजारो गरजवंतांना याचा लाभ होईल, अशी मागणी होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापुरात किरकोळ कारणावरून ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला..