दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : शिवसेना पुणे जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष व विकासधारा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी वर्गासाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटिका तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपजिल्हा समन्वयिका सीमा कल्याणकर यांनी बैठकीमध्ये दिली.
या बैठकीत विशाल धुमाळ, ऍड. आनंद केकाण, सागर आवटे, सोमनाथ लांडगे, शाबुद्दिन सय्यद यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सीमा कल्याणकर यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यत जाऊन शासकीय योजनांचा लाभ पोहचवण्यासाठी आनंद कृषी महोत्सव कृषी व औद्योगिक प्रदर्शन इंदापूर येथे आयोजित केलेले आहे. शेतकरी वर्गाच्या आरोग्याच्या दृष्टीने 29 डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये बारामती हॉस्पिटल, क्रिटीकेअर सेंटर इंदापूर, मगर अॅक्सिडेंट व नेत्र रुग्णालय व आरोग्य विभाग पुणे जिल्हा यांच्यावतीने शेतकरी बांधवांची मोफत हृदयरोग तपासणी, नेत्र तपसणी, मोफत करणार आहेत. अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत केली जाणार असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य मदत कक्ष प्रमुख मंत्रालय तथा विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिराचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याणकर यांनी केले.
यावेळी युवा सेना सचिव किरण साळी, ममता शिवतारे-लांडे, बामसेफचे राष्ट्रीय महासचिव एड. राहुल मखरे, बारामती डी. वाय. एस. पी. गणेश इंगळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सोशल मीडिया प्रमुख भूषण सुर्वे हे उपस्थित राहणार आहे.