भिगवण: भिगवण पोलिसांच्या (Indapur News) चोख कारवाईत घरफोडी (Pune Crime) करणारा अट्टल चोर ‘छोटू’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आरोपीकडून तब्बल 7 तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि 3,13,692 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दि. 11 सप्टेंबर रोजी भिगवण येथील वॉर्ड नं 4 मध्ये घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिस पथकाने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजू उर्फ छोटू कुंडलिक म्हेत्रे हा लातूर जिल्ह्यातील रहिवाशी असून त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भिगवणसह बारामती विभागातील विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 3,13,692 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भिगवण पोलिस ठाण्यातील हवालदार महेश उगले हे गुन्ह्यांची उकल करण्यातील कौशल्यासाठी ओळखले जातात. तपासातील बारकाई, परिस्थितीचे अचूक विश्लेषण आणि आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची त्यांची तल्लख पद्धत उल्लेखनीय आहे. या प्रकरणातही उगले यांनी आपल्या चातुर्यकौशल्याने व तपासातील चिकाटीने आरोपीचा मागोवा घेऊन पोलिसांना मोठी मदत केली. त्यांच्या कामामुळे गुन्ह्याची उकल जलद गतीने होऊन फिर्यादींना न्याय मिळवून देण्यात आला. भिगवण परिसरातील गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांच्या तत्परतेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.
या अट्टल चोरावर तळेगाव ढमढेरे, देवडी, बारामती, इंदापूर, भिगवण आदी ठिकाणी 12 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या कारवाईने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार महेश उगले, पोलिस नाईक संतोष मढके, संदीप पवार, योगेश कुलकर्णी, तुषार रायकर, संकल्प जाधव, चेतन पवार व दिपाली मोरे यांनी सहभाग घेतला.
ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभागाचे गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.






