इंदापूर, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये १६ मार्च रोजी रात्री ही घटना घडली. याच घटनेतील खून करण्यात आलेला अविनाश धनवे हा मोक्कामधील आरोपी असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
अविनाश हा एक महिन्यापूर्वी जेलमधून बाहेर आला होता. अविनाश आळंदीमध्ये कोयता गँगचा म्होरक्या होता. सदर घटनेनंतर अविनाशच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खुशाल तापकिर, विशाल तापकिर, मयुर पाटोळे, राहुल चव्हाण, देवा सुतार, मयुर मानकर, शिवा बेडेकर, प्रकाश उर्फ पप्पु बनकर, सतिष पांडे, प्रणिल उर्फ बंटी मोहन काकडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे- सोलापूर रष्ट्रीय महामार्गावर इंदापूर बाह्यवळण येथे जगदंब हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ८ वाजता अविनाश आणि त्याचे मित्र जेवणासाठी बसले होते. यावेळी दोन तरुण हॉटेलमध्ये शिरले. कुणाला काही कळण्याआधीच त्यांनी अविनाशवर गोळ्या झाडल्या. तसेच अविनाश खाली पडल्यानंतर त्यांनी कोयत्याने त्याच्यावर वार केले. या घटनेत अविनाशचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी अविनाशच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली. त्यावेळी तिने पोलिसांना सांगितले की, दोन जण अविनाशला घरी बोलवायला आले होते. तेव्हा तो त्यांच्यासोबत बाहेर गेला. त्यानंतर त्याच्याच साथीदारांनी कट रचून त्याची हत्या करण्यात आली. असं अविनाशच्या पत्नीने म्हटलं आहे.