पुणे: इंदापूर विधानसभेची जागा महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढविण्यात येण्याची शक्यता आहे. जर ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना देण्यात आली, तर प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस भवनची इमारत व जागा काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देत नाहीत, तोपर्यंत त्यांना उमेदवारी देण्याचा विचार करू नये, अशी मागणी काँग्रेसचे इंदापूरचे तालुकाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांना पुण्यातील काँग्रेस भवन येथे निवेदन देण्यात आले आहे. काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतींच्या दरम्यान निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने इंदापूर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमदार, मंत्रीपदे दिलेली असूनही ज्या वेळी प्रतिष्ठित व्यक्तीने काँग्रेस पक्ष सोडला, त्या वेळी इंदापूर काँग्रेस भवन इमारतीची आतून संपूर्ण मोडतोड करून इमारतीचे नुकसान केले आहे. इमारतीचा कब्जाही सोडला नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. वास्तविक पाहता इंदापूर काँग्रेस भवनची इमारत व जागा सध्या इंदापूर काँग्रेस कमिटीच्या ताब्यात नसून, मालकीहक्क संबंधाच्या कागदपत्रामधे फेरफार केलेला आहे. त्यानुसार संबंधित कागदपत्रांवर इंदापूर तालुका काँग्रेस चॅरीटेबल ट्रस्ट, इंदापूर असे लावण्यात आले असून, या संदर्भात सिटी सर्व्हे, मिळकतपत्र व जागेचा नकाशाबाबत खोटी कागदपत्रे तयार करण्यात आलेली आहेत.
सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे काम करत आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामध्ये इंदापूरची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना देण्यात आली, तर या गटामध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस भवनची इमारत व जागा ताब्यात ठेवली आहे, ती जोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देत नाहीत, तोपर्यंत त्यांना उमेदवारी देण्याबाबत विचार करू नये, अन्यथा ही बाब संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्यात येईल, अशी इंदापूर मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकत्यांनी भूमिका मांडली असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले. तसेच, आता हीच वेळ आहे की, इंदापूर काँग्रेस भवनची इमारत व जागा परत काँग्रेस पक्षास मिळू शकेल, तरी ही भूमिका महाविकास आघाडीमधे मांडणे अत्यंत गरजेचे असल्याचेही कार्यकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे.