इंदापूर : येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथील दहावीत शिकणा-या विद्यार्थ्याचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनी घडली आहे. ही घटना गुरुवारी (ता.1) दुपारी घडली आहे.
प्रथमेश विकास खबाले (वय-16, रा, भाटनिमगाव, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश विकास खबाले हा इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथील दहावीत शिक्षण घेत होता. तो दुपारी शाळेत आल्यानंतर दररोजच्या प्रमाणे शाळेच्या प्रांगणात सामुहीक प्रार्थना झाल्यानंतर वर्गात गेला. त्यानंतर तो बाकावर बसला. तितक्यात त्याला चक्कर आली. त्यावेळी शिक्षक त्याच्याकडे जाऊन तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून त्याच्या ह्द्यावर पंपिंग केले, त्यानंतर त्यांनी तात्काळ त्यास इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेनंतर दुपारी शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली, दरम्यान शिक्षकांनी अश्रू अनावर झाले. ही घटना कळताच गावात शोककळा पसरली. तालुक्यातील सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.