बारामती: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेवर येणार असून, राज्यातील जनतेचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. इच्छुकांची संख्या मोठी आहे. इंदापूरसह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार ठरवताना इच्छुकांना विचारून नव्हे, तर कार्यकर्त्यांना विचारूनच उमेदवारीबाबतचा निर्णय घेतला जाईल. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल, असा अंदाज आहे, असे शरद पवार यांनी मत व्यक्त केले.
बारामतीमधील गोविंदबाग येथे पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. विधानसभेसाठी महाविकास आघाडीची जागा वाटपाची प्रक्रिया संपल्यावर योग्य निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य करत, उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे पवार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमधून इच्छुक असलेले अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, दशरथ माने, अमोल भिसे, तेजसिंह पाटील, सागर मिसाळ, महारुद्र पाटील, अशोक घोगरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने निर्णय घेण्याचे अधिकार संजय राऊत, नाना पटोले व जयंत पाटील यांना दिले आहेत. जागावाटप झाल्यावर उमेदवारीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पंतप्रधान लोकसभेच्या ४०० जागा येतील, असे सांगत होते; मात्र त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. लोकसभेला आम्ही १० जागा लढवल्या, त्यातील ८ जागांवर विजय मिळाला. यंदा लोकांनीच बदल करायचा निर्णय घेतला होता. नेत्यांनी काही सांगितले तरी लोकांनी त्यांना जे योग्य वाटले तो निर्णय घेतला.
बारामतीतही अनेक नेत्यांनी भाषणे केली, पण तुम्हीच ठरवलेले होते, दीड लाखांहून अधिक मताधिक्याने आपला उमेदवार विजयी झाला. काही लोकांना आभाळाकडे बघून पाऊस पडेल की नाही ते समजते, आता अनेकांना वाटू लागले आहे. पाऊस पडेल त्यामुळे आपल्याकडे गर्दी वाढू लागली आहे. राज्यात कुठेही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोक जमतात. लोकांनीच या निवडणुकीत जिंकायचे ठरवल्याने विधानसभेला चांगले निकाल लागतील, माझा अंदाज आहे. ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान आयोग तारखा जाहीर करतील. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत आम्ही उमेदवार निश्चित करू. इंदापूरच्या बाबतीतही सर्वांशी विचारविनिमय करून मगच निर्णय घेतला जाईल. यामुळे निवडून येण्याची क्षमता विचारात घेत सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.