इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि राजकारणातील युवा नेतृत्व प्रवीण माने हे उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माने यांच्या जाण्याने अजित पवार गटाला धक्का मानला जात आहे. पुणे शहरातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी प्रवीण माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र, याच दरम्यान अचानक प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी प्रवीण मानेंवर अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, माने आता अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार आहेत. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण मानेंच्या शरदचंद्र पवार गटातील प्रवेशाने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बळकटी मिळाली आहे.