युनूस तांबोळी
पुणे, वन, जंगलातील वणवा, आग, वृक्षतोड ह्या घटना वन्य जीवांना नाशाकडे नेऊ लागल्या आहेत. त्यामुळे निसर्गातील जैविक साखळी तुटू लागली आहे. या घटनाचा परिणाम प्रजनन काळात होऊन काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत. परस्परांवर अवलंबून असणारी निसर्गसाखळी तुटली तर त्याचा थेट परिणाम निसर्गावर होतो. हे माहित असूनही मानव याकडे दुर्लक्ष करत आहे.
वनविभाग देखील ‘वन्य जीव सप्ताह’ राबवून फक्त मार्गदर्शन करून कार्यक्रम राबवते. त्या पेक्षा वन्यजीवांचे आयुष्य वाढवायचे असेल तर जंगलातील अन्न साखळी वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी वणवा, आग, वृक्षतोड थांबली पाहिजे. यासाठी मानवाने सहभाग घेऊन निसर्ग वाचविण्याचे काम केले पाहिजे. त्याच वेळी ‘वन्यजीव सप्ताह’ राबविला गेल्याचा खरा आनंद होईल.
जबाबदारी कोणाची…
राष्ट्रिय पातळीवर वनविभागा अंतर्गत 1 ते 7 आक्टोंबर हा ‘वन्य जीव सप्ताह’ राबविला जातो. काही ठिकाणी प्राणी पक्षी प्रेमी एकत्रीत येऊन पक्षांसदर्भात माहिती घेतात. त्याचे छायाचित्र, माहिती जतन करतात. वनविभाग शाळा कॅालेज मधून व्याख्यान आयोजीत करतात. त्यातून निसर्गातील या पक्षी, प्राण्यांची माहिती दिली जाते. त्यांच्यापासून संरक्षण कसे करायचे हे सांगितले जाते. उन्हाळ्यात छतावर अन्न व पाणी उपलब्ध करून द्या हे देखील सांगितले जाते. मात्र तो फक्त अभ्यासाचा भाग ठरतो.
प्राणी पक्षांसाठी जंगलात पाणथळ उपलब्ध करण्याचे काम प्रत्येक्षात किती प्रमाणात होते. हा अभ्यासाचा विषय आहे. बोटावर मोजण्या इतक्या शाळा देखील परिसरात पक्षांसाठी अन्न व पाण्याची सुवीधा उपलब्ध करून देत असतात. पुणे जिल्ह्यात अनेक गावातील परिसरात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे अनेकवेळा अन्न व पाण्याची उपलब्धता करा असे आवाहन करावे लागते. मोराची चिंचोली या गावात या राष्ट्रिय पक्षाच्या अस्थित्वामुळे कृषी पर्यटनातून व्यवसाय केला जातो. त्यामुळे अन्न, पाणी, संरक्षणाची जबाबदारी देखील या भागातील नागरिकांनी घेणे आवश्यक आहे.
वणवा, आग आणि वृक्षतोड…
डोंगरांना वणवा किंवा जंगलात आग लागणे हा भयंकर प्रकार सगळ्यात भागात दिसून येतो. त्यातून या डोंगर माथ्याला असणारे लहान किटकापासून वन्य प्राणी मारले जातात. अनेक पक्षांची घरटी नाहिसी होतात. त्यातून काही प्रजाती नाहिश्या झाल्या आहेत. ही घटना डोळ्या समोर घडत असली तरी त्याला वाचविण्याचे काम कोणी करत नाही. जंगलात आग लागल्यावर या प्राण्यांची होणारी पळापळ त्यातून त्यांचे प्रजनन कार्यात निर्माण होणारे अडथळे मानव केव्हा समजून घेणार आहे. राज्यातील बहुतेक भागात रात्रीचे होणारे हे प्रकार संशयास्पद आहेत. अनेक वेळा झाडांची होणारी कत्तल हा देखील गंभीर विषय आहे. वनविभागाचे झाड संरक्षणाबाबत असणारे कायदे देखील अतिशय कडक आहेत. तरीदेखील गाड्याच्या गाड्या भरून लाकडाची वाहतूक होते. याला आळा कधी बसणार आहे. मानवा ने या बाबत सहकार्य करून वन, जंगलाना अभय दिले पाहिजे.
अन्नसाखळी वाढवा आयुष्य वाढेल…
जंगालातून प्राणी बाहेर येऊ नयेत यासाठी अनेक उपाय योजना करणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी जंगलात पाणवठे तयार केल्यावर वन्य प्राण्यांची भटकंती थांबणार आहे. एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतात. त्यामुळे ही जीवन साखळी सुरू राहिली आहे. त्यामुळे ज्या पक्षाला, प्राण्याला जे भक्ष पाहिजे. त्याची सुवीधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. बिबट सारखा प्राणी हा भक्षासाठी मानववस्तीकडे धाव घेतो. त्याचे भक्ष त्याला जंगलात मिळाले तर तो अशी भटकंती करणार नाही. यासाठी लहान लहान प्राण्याची उत्पत्ती त्या परिसरात करणे आवश्यक आहे. त्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला पाहिजे. जंगलातील वृक्षांची संख्या वाढवली पाहिजे. त्यातून पक्षांना देखील त्यांचे अन्न उपलब्ध होईल.
दरम्यान, चिंचा च्या हंगामात वानरे देखील शिरूर तालुक्याच्या गावात मानववस्तीकडे आली होती. त्याच अन्नाची उपलब्धता जंगल, वनात करणे आवश्यक आहे. जंगलापासून आपल्याला अनेक फायदे असल्याने वृक्षाची तोड होणार नाही. याकडे मानवाने लक्ष दिले पाहिजे. तरच निसर्गातील वन्य प्राण्यांकडून होणारे हल्ले थांबतील.