बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघ नणंद-भावजयांच्या लढतीमुळे चर्चेत असतानाच आता शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यामुळे विशेष चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंनी शड्डू ठोकला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना समज दिल्यानंतरही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शिवतारे अद्यापही ठाम आहेत. याच भूमिकेमुळे आता त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवतारेंमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीची वाढत असल्याने शिवतारेंवर शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. शिवसेनेने महायुतीतील घटक पक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विजय शिवतारेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अटळ आहे. त्यामुळेच शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता शिवतारे यांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही त्यांनी बंडखोरी केल्यास शिवसेनेच्या इतर जागांवर देखील निश्चितच त्याचा परिणाम होणार आहे. शिवतारेंच्या बंडाचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसणार आहे. असे झाल्यास शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांची राष्ट्रवादी करणार नाही, अशी भूमिका पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.
या नाट्यानंतर शिवतारे भूमिका बदलणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.