उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील ग्रीन फॅन्टसी सोसायटीतील एक आलिशान कार चोरून नेण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न शुक्रवारी (ता. ०२) मध्यरात्री फसला. दुचाकी चोरीचे प्रमाण आटोक्यात नसतानाच आता चोरट्यांनी चारचाकी वाहनांना लक्ष्य केल्याने उरुळी कांचनसह परिसरातील वाहनमालकांमध्ये घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील ग्रीन फॅन्टसी सोसायटीत कांबळे यांचे घर आहे. त्यांनी घरासमोर लावलेली त्यांची चारचाकी महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही नवीन कार घराशेजारी असलेल्या जागेत पार्क केली होती. सकाळी कांबळे हे काही कामानिमित्त बाहेर निघाले असता त्यांची गाडी काही अंतरावर बंद पडली.
कांबळे यांनी खाली उतरून पाहिले असता इंजिनला पुरवठा करणाऱ्या डिझेलचा पाईप धारदार शास्त्राने कापण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी पाहणी केली असता डिझेलच्या शेजारी असलेली गाडीची सेन्सर वायर तोडली होती. यावेळी कांबळे यांच्या लक्षात आले की, चोरटे हे वायर तोडत असताना चुकून डिझेलचा पाईप पण कट झाला. त्यामुळे चोरट्यांना गाडी चोरून नेता आली नाही. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तगडी पोलिस यंत्रणा असतानाही चोरीच्या घटनांमध्ये वाढ
उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी येथे सुरक्षारक्षकाच्या कानाला पिस्टल लावून चारचाकी कारची चोरी करून चोर निघून गेले होते. त्याचाही शोध अजूनही लागला नाही. काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन येथून फॉर्च्युनर गाडी चोरीला गेली होती. तिचाही अद्याप शोध लागू शकला नाही. त्यामुळे तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. तर लोणी काळभोर पोलीस मात्र ‘ऑल इज वेल’ असल्यासारखे वागत आहेत.