राहुलकुमार अवचट
यवत : पहाटे जाणवणारी थंडी, दुपारी पडणारे कडक ऊन, रात्रीचा उकाडा, अचानक येणारा पाऊस यामुळे यवत परिसरात विषाणूजन्य संसर्गाच्या (व्हायरल इन्फेक्शन) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. वातावरणातील प्रदूषण, पाणी, धूळ हे घटकदेखील आजारपणाचे कारण ठरत आहेत. घसा दुखणे, सर्दी, खोकला, जुलाब, अंगदुखी, तापाचे रुग्ण ग्रामीण रुग्णालयात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
खासगी रुग्णालयांत देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यवत ग्रामीण रुग्णालयात सध्या दिवसाला ४०० ते ४५० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येत आहेत. पावसाळा सुरू झाला की विविध आजरांच्या साथी पसरतात. पाऊस सुरू झाल्यावर हवेत निर्माण होणारा गारवा आणि पाऊस थांबल्यानंतर अचानक येणारे दमट आणि उष्ण हवामान या आजारांसाठी कारणीभूत ठरतात. या दिवसात श्वासनाचे आजार असलेल्या विषाणूंची संख्या अधिक वाढते. लहान मुलांच्या आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित आजाराचे निदान करून योग्य ते उपचार करावेत.
कधी ढगाळ वातावरण, कधी कडक ऊन,कधी गारवा तर कधी पाऊस असा वातावरणात बदल होत असल्याने गेल्या ८ दिवसांपासून यवतसह परिसरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खाजगीसह सरकारी रुग्णालयात रुग्णांची गर्दी होताना दिसत आहे.
वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, खोकला तसेच पेशी कमी किंवा जास्त होणे, थकवा जाणवणे, टायफाइड, डेंगू अशा विविध आजारांनी नागरिकांना वेढले आहे. वेळीच उपचार केले तर रुग्णांना दोन-चार दिवसांत आराम मिळतो. याकाळात रुग्णांनी वेळेवर पोटभर जेवण करावे, तळलेले, उघड्यावरचे, शिळे अन्नपदार्थ टाळावे, जास्त प्रमाणात पाणी प्यावे, सकस आहार घ्यावा, दुखणे अंगावर काढू नये, असे आवाहन यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर पत्की यांनी केले आहे.
काय काळजी घ्याल ?
- संतुलित आणि समतोल आहार घ्यावा
- पुरेशी झोप, व्यायाम यावर भर द्यावा
- भरपूर पाणी प्यावे. हात सतत धुणे गरजेचे
- गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी
- तिखट, चमचमीत आणि मसाल्याचे पदार्थ टाळावेत
- मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात
- रात्री झोपताना हळददूध घ्यावे
- रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा
गावात सर्वत्र स्वच्छता, साफसफाई केली जात असून कचराकुंड्या स्वच्छ केल्या जातात. ग्रापंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात धूर फवारणी चालू असून ओढ्याच्या कडेने बीएचसी पावडर शिंपडण्यात आली आहे
-समीर दोरगे, सरपंच, यवत