दौंड : दौंड तालुक्यातील मळद येथील माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापक सुभाष वाखारे व मुख्य आरोपी शिक्षक बापूराव धुमाळ या दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात अली आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड यांनी दिली.
या प्रकरणी दोन्ही आरोपींना दौंड पोलिसांनी अटक केल्यानंतर 23 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 29 ऑगस्ट (7 दिवस) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजार करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
शिक्षकाने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षकाच्या या संतापजनक कृत्याचा संपूर्ण तालुक्यातून निषेध करण्यात आला. अनेक राजकीय नेत्यांनी मळद ग्रामस्थांची भेट घेत या घटनेचा निषेध केला. तसेच आरोपींना कठोर शिक्षेची मागणी देखील केली. सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालविला जावा, या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी, आरोपींना कठोर शासन करण्यात यावे, तसेच दोघा आरोपींना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मळद ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
आमदार राहुल कुल यांनी घेतली मळद ग्रामस्थांची भेट
आमदार राहुल कुल यांनी देखील मळद ग्रामस्थांची भेट घेतली. शाळेतील अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडलेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून आरोपींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही असं कुल यावेळी म्हणाले. तसेच याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार असून शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची देखील मागणी करणार असल्याचे आमदार राहुल कुल यावेळी म्हणाले.