पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजित दौरे अचानकपणे रद्द केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आजही शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदारसंघातील गोखलेनगर भागात ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता होणार होते. नियोजित दौरा असल्यामुळे अजित पवार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण त्यापूर्वीच आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले. यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळाची स्थती निर्माण झाली होती.
दरम्यान, उद्घाटनाचा कार्यक्रम आधीच उरकल्यामुळे पोलीस अधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादाचा प्रकार घडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना पोलिसांनी आत जाण्यापासून रोखले होते. त्यावरून पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्येही वाद झाला.
या सर्व घटना-घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन कार्यक्रमाला येणार नसल्याचे कळविले. तर या कार्यक्रमासह पुणे शहर आणि ग्रामीण भागातील इतर पाच कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे रद्द केले. हे सर्व कार्यक्रम अजित पवार यांनी अचानकपणे का रद्द केले असावेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.