योगेश शेंडगे/शिक्रापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा (मुले-मुली) ७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे शहर, पुणे ग्रामीण, नाशिक, आणि अहमदनगर जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झालेले आहेत. या उद्घाटन प्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव शिवाजी उत्तेकर, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समीतीनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे, ऍड. सुभाष पवार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. डि. एच. बोबडे इत्यादी उपस्थित होते. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिलजी बोरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहीते यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी महाविद्यालय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांची माहिती दिली. खेळाने शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक बळकटीकरण होते, असं त्यांनी आपल्या भाषणात नमुद केले, तसेच खेळाडूंनी हार न मानता खंबीरपणे आपले खेळाचे कौशल्य पणाला लावावे असे आवाहन केले.
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समीतीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ .महेंद्र अवघडे म्हणाले कि, पुणे शहर, पुणे ग्रामीण, नगर, आणि नाशिक विभागातून आठ संघ सहभागी झाले आहेत. यामधून एक मुलींचा व एक मुलांचा संघ आंतर विद्यापीठीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल. सदरची आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा प्रथमच पुणे शहराच्या बाहेर ग्रामीण भागातील सी.टी.बोरा महाविद्यालयात होत आहे. तसेच या पुढील स्पर्धाही शहराच्या बाहेरील महाविद्यालयांमध्ये होतील, असे महेंद्र अवघडे म्हणाले.
क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव शिवाजी उत्तेकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योगपती, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी धारिवाल यांनी महाविद्यालयात सदर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्याबद्दल त्यांनी प्राचार्य, क्रीडा संचालक व सर्व सहकारी प्राध्यापकांचे अभिनंदन व कौतुक केले व स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष अनिलजी बोरा यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात तेंडुलकर सारख्या खेळाडूंचे आदर्श खेळाडूंनी ठेवायला पाहीजे असे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी नंदकुमार निकम, सचिव शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ व प्राचार्य डॉ. के. सी. मोहीते यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मंजुषा पाटील यांनी केले तर आभार शारीरिक शिक्षण संचालक डॉ अप्पासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.