संतोष पवार
पळसदेव : कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि शासकीय तांत्रिक विद्यालयात एकाच वेळी संविधान मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण आभासी पद्धतीने करण्यात आले. याच धर्तीवर इंदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संविधान मंदिराच्या उद्घाटन व लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आनंद कामोजी जनरल मॅनेजर बिल्ट ग्राफिक्स पेपर इंडस्ट्रीज लिमिटेड, रविन्द्र चौगुले असिस्टंट मॅनेजर वाल मॉट इंडस्ट्रीज, संस्थेचे प्राचार्य नितीन माने सह संस्थेचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक, संस्थेतील कर्मचारी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. महाराष्ट्रातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि शासकीय तांत्रिक विद्यालयात एकाच वेळी संविधान मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण आभासी पद्धतीने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते रविवार (दि. 15) सकाळी साडअकरा वाजता पार पडला.
यावेळी आमदार भरणे यांनी युवकांनी ध्येय उराशी बाळगून शिक्षण घ्यावे आणि नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा उद्योजक होण्याचे ध्येय ठेवण्याचा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. युवकांनो नेहमी उच्च ध्येय ठेवा आणि ते गाठण्यासाठी समोर बसलेल्या कारखान्याचे प्रतिनिधी यांना डोळ्यासमोर आणावे, आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर आणावे, नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत व्यक्त केले.
यावेळी आनंद कामोजी यांनी संविधान निर्मितीचा इतिहास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयीचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेत 12 ते 14 सप्टेंबर या कालावधीत संविधान महोत्सव, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती गटनिदेशक अनिल सोनटक्के यांनी दिली.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, आनंद कामोजी, रविन्द्र चौगुले, नितीन माने, गटनिदेशक अनिल सोनटक्के, धर्मराज सोनटक्के, पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पवार आदिंसह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार राम खत्री यांनी मानले.