भोर / जीवन सोनवणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या खबरदारी व सूचनांसाठी राजगड पोलिसांनी राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
जानकीराम मंगल कार्यालय नसरापूर (ता. भोर) येथे श्री गणेशोत्सव २०२३ वे अनुशंगाने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर उपविभाग सासवड यांच्या मागर्दशनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील यांची बैठक घेऊन त्यांना गणेशोत्सवाचे अनुशंगाने सुचना दिल्या. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार, पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
तसेच गणपती स्थापनेचे आसन मजबूत करून, पावसापासून संरक्षण होईल असे पाहावे. तसेच सजावटीचे वेळी दिवे, मेणबत्ती, उदबत्ती यापासून आग लागू नये याची दक्षता घ्यावी. तसेच श्रींच्या समोर हॅलोजन लॅम्पसारखे प्रखर तेजाचे दिवे लावू नयेत. त्यामुळे भुसा, कागद, कापड पेट घेऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असते. इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशी कोणतीही बाब नसावी.
उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे आयोजित करण्यास व सामाजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य दयावे. प्रत्येक मंडळाने स्थापित केलेल्या श्रींच्या मूर्तीची व सजावटीची देखभाल करण्यासाठी मंडळांचे कमीत कमी दोन कार्यकर्ते २४ तास मंडपात हजर राहतील अशी व्यवस्था करावी, यांसह अशा अनेक सूचना यावेळी देण्यात आल्या.