पुणे : मागील आठवड्यात पुण्याच्या तापमानात अचानक वाढ झाल्याने पुणेकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. या आठवड्यात पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आकाश निरभ्र झाल्याने उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. परिणामी शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या २४ तासांत तापमानात ३ अंशांची घट झाली. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, सोमवारी (ता. ४) शिवाजीनगर येथे सकाळचे तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
आयएमडीच्या अंदाजानुसार येत्या दोन-तीन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. देशातील हवामानातील अस्थिरतेचा परिणाम पुण्यातील हवामानावर झाला आहे. गेल्या २४ तासांत शहराच्या किमान तापमानात ८ अंशांची वाढ झाली. २० मार्च रोजी २० अंश तापमानाचा अनुभव घेतल्यानंतर पुण्याच्या किमान तापमानात हळूहळू घट जाणवू लागली. ३ मार्च रोजी तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. २४ तासांत त्यात तीन अंशांची घसरण होऊन तो १३ अंशांवर पोहोचला.
पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, “सध्या पुण्यात आकाश निरभ्र आहे आणि शहराच्या किमान तापमानात घट होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहणार असून या कालावधीत तापमानात ४ ते ५ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
पुणे जिल्ह्यातील तापमान
शिरूर आणि लोणावळा परिसरात १०.७ आणि १०.९ अंश तापमानाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (११.३), हवेली (११.५), नारायणगाव (११.६), माळीण (११.६) आणि एनडीए (११.९) या पाच ठिकाणी तापमान ११ अंशांच्या दरम्यान होते.
दरम्यान, आजही मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे थंडीत वाढ झाली आहे. पुढील २४ तासांत अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, हिंगोलीसह पुण्यात पावसाची हजेरी लागणार आहे.