पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावर महिलेच्या नावाने पाठविलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची भीती दाखवून थरमल इमेजिंग करायचे असल्याचे सांगून एका महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ ते ११ ऑगस्ट या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या एका आयटी कंपनीत कामाला आहेत. सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेशी संपर्क करून तुमच्या नावाने मलेशिया येथे एक पार्सल पाठविण्यात येत आहे. त्यामध्ये खोटे १२ एटीएम, खोटा पासपोर्ट आणि १४० ग्रॅम एमडी असल्याचे सांगून अटकेची भीती दाखवली. सायबर चोरट्यांनी तुम्हाला पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागले, असे सांगितले.
त्यानंतर दिल्लीतील वसंत कुंज पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून तपासणीसाठी आरबीआय बँकेत पैसे पाठवायला लावले. फिर्यादी यांना दिलेल्या वेगवगेळ्या यूपीआय आयडीवर २ लाख २२ हजार पाठवले. यानंतर परत फिर्यादी यांना फोन करून तुम्ही ड्रग्ज घेता किंवा शरीरात लपवता का, असे विचारून थरमल इमेजिंग करायचे असल्याचे सांगितले. सायबर चोरट्यांनी व्हिडीओ कॉल करून फिर्यादी यांना विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.