पुणे – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतो. अशी खोटी बतावणी करून एकाने महिलेकडे चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार निगडी प्राधिकरण येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेश दशरथ वाघदरे (वय-४२ रा.खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.२५) फिर्याद दिली आहे. तर हा प्रकार २ जून २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर दाखल असलेल्या पोलीस केसमध्ये मदत करतो म्हणून आरोपी मेश वाघदरे याने पिडीत महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर आरोपीने महिलेच्या व्हॉटसअपवर अश्लिल मॅसेज करण्यास सुरुवात केली. तसेच फोनकरून फिर्यादीला शरीर सुखाची मागणी केली.
दरम्यान, आरोपी मेश वाघदरे याने महिलेला सांगितले माझी पोलीस ठाण्यात ओळख आहे. जर तू माझे ऐकले नाही तर तुझ्यावरच उलट केस करेन अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.