पिंपरी- चिंचवड : पुण्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी आग लागण्याच्या घटना ताज्या असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथे लागलेल्या आगीमध्ये होरपळून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या ४० जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले.
या घटनेमध्ये ललित अर्जुन चौधरी (वय २१) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय २३) या सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला आहे. वाल्हेकरवाडी येथील लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. लाकडांना लागलेली ही आग एवढी भडकली की आगीच्या झळा शेजारील विनायक अल्युमिनियम प्रोफाइल डोअरला बसली. या भीषण आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन भावांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला.
याबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री शहरातील वाल्हेकरवाडी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. याची छळ शेजारील दुकानांना बसल्याने त्याही दुकानांना भीषण आग लागली. शेजारील दुकानात दोघे झोपले होते. त्यांचा झोपेतच बेशुद्ध होऊन होरपळून मृत्यू झाला आहे.
या भीषण आगीत लाकडाची वखार जळून खाक झाली आहे. तसेच एक चारचाकी देखील जळून खाक झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाची पाच वाहने दाखल झाली होती. तर, अग्निशमन दलाच्या ४० जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.