जनार्दन दांडगे
लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील गावांमधील नागरिकांनी ३१ डिसेंबरच्या व वर्षाच्या शेवटच्या मुहूर्तावर हॉटेलसह चिकन मटनच्या दुकानात मटण आणि चिकन खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
मांसाहार प्रेमींनी वर्षाच्या अखेरचा दिवस असल्याने व नवीन वर्ष सुरु होत असल्याने पार्टीचा शेवटचा दिवस आज शनिवार (ता. ३१) असल्यामुळे सकाळपासूनच मटण, चिकन अंडी आणि मास्याच्या दुकानात गर्दी करीत आहेत. त्यातच उद्या रविवारची सुट्टी असल्यामुळे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनीही चिकन खरेदीसाठी दुकानात गर्दी केल्याची माहिती लोणी स्टेशन येथील चिकन व्यवसायिक नासीर खान पठाण यांनी दिली.
काही नागरिक गोड जेवण, फराळाला कंटाळून तिखट मसालेदार चिकन, मासे, मटणच्या जेवणाला पसंती देत आहेत. मळ्याखळ्यासह घराघरांत सामिष जेवणाची तयारी केली आहे. परिणामी चिकन, मासे, मटण अशा मांसाहारी पदार्थांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र आल्याने शहरासह ग्रामीण भागातील विविध हॉटेल व ढाब्यांवरची गर्दी वाढत आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी व येणाऱ्या रविवारी असलेल्या सुट्टीनंतर प्रथमच मित्र गोतावळा एकत्र जमत आहे.
पूर्व हवेलीत खास करून चिकन व मटणाचेच बेत आखले जात आहेत. विशेषतः चुलीवरच्या मटणाचा स्वाद घेण्यास सर्वजण आतूर असतात. त्यातही मटणाचा खास मसाला वाटून- घाटून तर्रीदार भाजी बनविण्यासाठी काही या भागातील खवय्ये प्रसिद्ध आहेत. मटणासह चिकनला मागणी चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना लोणी स्टेशन येथील चिकन व्यवसायिक नासीर खान पठाण म्हणाले, “शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणावर पुरक व्यवसाय म्हणून कोंबडी पालन करतात. कोंबडीच्या खाद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.मात्र, त्या परिस्थितीत सध्या तरी दर स्थिर आहेत. त्यातच वर्षातील आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी चिकन खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.” पूर्व नियोजन करून दुकानात काम करण्यासाठी जादा कामगार ठेवण्यात आले आहेत.”