लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक पोलीस कर्मचारी गैरहजर असल्याने, त्याच्या अनुपस्थितीत त्याजागी चक्क एक मद्यपी वाहतूक सुरळीत करीत असल्याचा धक्कादायक प्रकार कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात सोमवारी (ता. ११) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. त्यामुळे ”वाहतूक पोलीस आहेत नावाला अन् काम करतात कुण्या गावाला” असा संतप्त सवाल लोणी काळभोर ग्रामस्थांनी विचारला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला. तर अजूनही एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटना ताज्या असताना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, लोणी स्टेशन चौकात वाहतूक पोलीस गैरहजर असताना एका मद्यपीने वाहतूक सुरळीत करणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्याचा प्रकार असल्याची चर्चा होत आहे.
हनुमंत वसंत बनसोडे (वय अंदाजे ३५, कवडी माळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे वाहतूक सुरळीत करणाऱ्या मद्यपीचे नाव आहे. बनसोडे हा सोमवारी (ता. ११) लोणी स्टेशन चौकात १ तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी सोडवत होता. या कालावधीत अपघाताने मोठी दुर्घटना घडली असती, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांची नेमणूक कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलीस सकाळी हजेरी लावतात, सेल्फी काढतात व वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवितात. त्यानंतर ते थेट संध्याकाळच्या सुमारास नियुक्तीच्या ठिकाणी दिसत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र, यावर वरिष्ठ अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याने असा प्रकार सर्रासपणे पुणे-सोलापूर महामार्गावर पाहायला मिळत आहे.
… तर पोलीस नेमकं करतात तरी काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या ठिकठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. वाहतूक पोलीस सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जर उपाययोजना करत नसतील, तर पोलीस करतात तरी काय? त्यामुळे ‘वाहतूक पोलीस आहेत नावाला, काम करतात कुण्या गावाला?’ असं म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
आडोसा किंवा ‘सुरक्षित’ ठिकाणीच बस्तान..
सध्या बहुतांश चौकात वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमन सोडून आडोशाला थांबत असल्याचे चित्र आहे. इतकेच नाही, तर काही वाहतूक पोलीस हे दुचाकी, हॉटेल किंवा बाकड्यावर बसल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. जर वाहतूक पोलिसच अशा प्रकारे ‘सुरक्षित’ जागा शोधत असतील, तर सर्वसामान्यांसह वाहनचालकांची सुरक्षा रामभरोसेच, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
‘संबंधितावर कारवाई करणार’
मद्यपी वाहतूक सुरळीत करीत असेल तर ती एक गंभीर बाब आहे. झालेल्या प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे. सरकारी नियमाप्रमाणे संबंधितावर कारवाई केली जाईल. – वेंकटेश देशपांडे (सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, पुणे)