यवत : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी आज राज्यभरात ‘चक्का जाम’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यवत येथेही पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्या आडव्या लावून रस्ता रोखत ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.
पुणे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी ‘चक्का जाम’ आंदोलन सुरू असून, यवत येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील भुलेश्वर फाटा येथे मराठा बांधवांनी भोर-शिरूर व पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने बैलगाड्या आडव्या लावून अनोख्या पद्धतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या वेळी आंदोलनकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील लढा देत असून, गेल्या सात दिवसांपासून ते अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने करून बंद पाळला जात आहे. याच पार्श्वभूमीवर यवत येथील सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ यवत येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तरुणांनी सरकारविरोधात घोषणा देत, तत्काळ मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तोडगा काढावा, अशी मागणी केली. पुढील काळात मनोज जरांगे यांना काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील व त्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्या-रस्त्यांवर आंदोलने केली जातील, असा इशारा या वेळी देण्यात आला.
दरम्यान, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, यवत येथे मराठा आंदोलकांनी सुमारे अर्ध्या तासांहून अधिक काळ रस्ता अडवून धरला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मराठा आंदोलकांनी याबाबतचे निवेदन यवत मंडल अधिकारी अर्चना वनवे यांना दिले. या वेळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. या वेळी यवत पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
View this post on Instagram