पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडी येथील बंगल्यावर काम करणार्या सुरक्षा रक्षकाच्या घरी धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकाने रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन ते बॅगेत कपाटात ठेवले होते. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून 13 वर्षाच्या मुलाच्या पायाला लागून तो गंभीर जखमी झाला आहे. अभय शिर्के (वय 13) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नितीन शिर्के हे मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या परवाना धारी रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन कसलीही काळजी न घेता रिव्हॉल्व्हर असलेली बॅग कपाटात ठेवली. त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घालण्यासाठी कपाट उघडले आणि त्याने शर्ट घातला. त्यानंतर पँट घालत असताना धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडून त्यातून गोळी सुटली. ती अभय याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागून तो जबर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.