शिरुर (पुणे) : अष्टविनायक रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना कवठे येमाई (ता. शिरुर) येथील ‘किनारा हॉटेल ‘समोर शुक्रवारी (ता. 12) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
इम्तियाज निसार तांबोळी (वय 48, रा. कवठे येमाई, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अन्य दुसऱ्या जखमीचे नाव अद्याप समजले नाही. मात्र त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाज तांबोळी हे दुचाकीवरून पाण्याचा जार घरी घेऊन चालले होते. तेव्हा त्यांची दुचाकी ‘किनारा हॉटेल ‘समोर आली असता, त्यांच्या दुचाकीची व अनोळखी दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तांबोळी यांच्या डोक्याला व अंगाला लहान- मोठ्या जखमा झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी त्वरित एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर दुसऱ्या जखमीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी तौसिफ तांबोळी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जखमी झालेल्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार एम. बी. मांडगे करीत आहेत.
इम्तियाज तांबोळी यांच्या अपघाती निधनाने कवठे येमाई गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तांबोळी यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दैनिक पुणे प्राईम न्यूज चे उपसंपादक युनूस तांबोळी यांचे ते मेव्हुणे होते.