-बापू मुळीक
सासवड : सुमारे सहा वर्षापूर्वी कदमवस्ती (ता.पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जागा कमी पडत होती म्हणून ग्रामस्थांनी पन्नास लाख किंमतीची अकरा गुंठे जागा मोफत दिली. त्यावेळी हस्तांतर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राहण्याचा योग आला. त्या जागेवर ग्रामस्थांच्या व प्रशासनाच्या सहकार्याने टुमदार, आकर्षक व देखणी इमारत उभी राहिल्याचे पाहून निश्चित समाधान वाटते. शाळेकडे पाहून ज्ञानमंदिरात आल्याचे समाधान मिळते. येथील राज्य गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षक अनंता जाधव व जिल्हा गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षिका सुरेखा जाधव या दांपत्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी राबवत असलेले विविध उपक्रम पुणे जिल्ह्यातील शिक्षकांना प्रेरणादायी असल्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी व्यक्त केले.
नुकताच पुणे जिल्हा अध्यक्ष चषक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती (ता.पुरंदर) प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पुणे जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी कदमवस्ती येथे भेट देवून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. तालुक्यातील इतर शिक्षकांनी या शाळेला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले.
भेटी दरम्यान प्रवेशद्वाराची सुंदर कमान, बोलक्या व बालस्नेही भिंती, ज्ञान वृद्धिंगत करणारे व शिकण्याची गोडी लागेल असे शैक्षणिक तक्ते, चित्रे, पेंटिंग्ज, संदेश, सुविचार, सामान्य ज्ञान, नकाशे, वर्गातच छोटीशी संगणक लॅब, मुलांना खेळण्यासाठी छोटीशी लॉन, घसरगुंडी, प्रवेशद्वारापासून वर्ग खोल्यांकडे नेणारा छोटासा रस्ता, पेव्हर ब्लॉक, वर्ग खोल्यांपुढे ठेवलेल्या कुंड्या व त्यातील फुलझाडे विद्यार्थ्यांकडे सोपवलेली झाडांची जबाबदारी, विद्यार्थ्यांचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटाचे कप्पे, प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही, व्हाईट बोर्ड, स्वतंत्र खोलीत अवांतर वाचनाची पुस्तके, भरपूर शैक्षणिक साहित्य, प्रश्नपेढी, प्रयोग साहित्य पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, केंद्रप्रमुख अनिल जगदाळे, अॅड. बी. एम. काळे, संदीप कदम, नंदकुमार चव्हाण, संजय बारवकर उपस्थित होते.
आजपर्यंत कदमवस्ती शाळा दत्तक घेतलेले, अॅड बी.एम. काळे, ग्रामस्थ व शिक्षक साकुर्डे व बेलसर ग्रामपंचायतींच्या समन्वयातून शाळेला पुरंदर तालुका सभापती चषक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 1- अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक, पुणे जिल्हा अध्यक्ष चषक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाल्याबद्दल निश्चित समाधान असल्याचे येथील ग्रामस्थ संपत गरुड, ईश्वर कदम, गोकुळ कदम, विशाल चव्हाण, श्रीकांत कदम, संदीप टिळेकर, भरत चव्हाण, बबन कदम, हनुमंत कदम, प्रियंका चव्हाण यांनी सांगितले.
कदमवस्ती शाळेला जागा कमी पडत असल्याचे पाहून जवळपास 50 लाख रुपये किंमतीची 11 गुंठे जागा ग्रामस्थांनी शाळेसाठी मोफत दिली. तसेच अनेक मान्यवर, देणगीदार व लोकसहभागातून माळरान जागेवर अनंता व सुरेखा जाधव शिक्षक दाम्पत्यांनी विद्येचे ज्ञानमंदिर (नंदनवन) उभारले. याचा सार्थ अभिमान वाटतो.
– संदीप कदम, अध्यक्ष- पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ