पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोयता गँगची दहशत अजूनही कायमी आहे. अशातच वानवडी भागातील एका १७ वर्षीय तरुणाचे काही महिन्यांपूर्वी दोघांसोबत भांडण झाले होते. तो राग मनात धरून दोघांनी कोयत्याने तरुणावर सपासप वार केले. या घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यश सुनील घाटे वय १७ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर साहिल लतीफ शेख वय १८, ताहीर खलील पठाण वय १८ वर्षे दोन्ही रा. रामटेकडी हडपसर, अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश सुनील घाटे हा तरुण आज(दि. ३) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आदित्य चव्हाण, रेहान पठाण, श्रेयश शिंदे यांच्यासोबत रामटेकडी येथील जामा मस्जिदपासून कॉलेजला जात होता. त्यावेळी साहिल लतीफ शेख आणि ताहीर खलील पठाण हे दोघे पाठीमागून येऊन त्यांनी यशवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. या घटनेत यश हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी यश घाटे याला मृत घोषित केले.
या प्रकरणातील आरोपी साहिल लतीफ शेख आणि ताहीर खलील पठाण यांना काही तासात अटक करण्यात आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून यशचा खून केल्याची माहिती समोर आली असून आरोपींकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.