पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीएनजी पंपावर गॅस भरत असताना अचानक नोझल उडल्याने कामगाराचा डावा डोळा निकामी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १५ डिसेंबर रोजी धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सीएनजी पेट्रोल पंपावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
हर्षद गणेश गेहलोत (वय-२३, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) असे या दुर्घटनेत डोळा निकामी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गेहलोत याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सीएनजी पंप मालकासह व्यवस्थाापक धैर्यशील पानसरे, राहीत हरकुर्की यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी येथील तीन हत्ती चौकात एस स्क्वेअर हा सीएनजी पंप आहे. तेथे हर्षद गेहलोत हा गेल्या वर्षीपासून काम करत आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो एका गाडीमध्ये सीएनजी गॅस भरत होता. त्यावेळी गॅस भरत असतानाच नोझल उडून गेहलोत याच्या डाव्या डोळ्यावर आदळले.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर हर्षदला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्याचा डोळा निकामी झाल्याचे सांगितले. सीएनजी पंपाचे मालक तसेच व्यवस्थापकाने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे. असे हर्षद गेहलोत याने फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी चव्हाण करीत आहेत.