पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीला घराबाहेर काढत स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा विवाह ३२ वर्षीय तरुणाशी घाईने लावून देण्याचा वडिलांचा प्रयत्न मुलीच्या आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या मदतीने हाणून पाडला. या प्रकरणात, न्यायालयाने पुणे पोलिसांच्या भरोसा सेलला चौकशी करून चार आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
कोंढवा परिसरातील या दांपत्यामध्ये सातत्याने भांडण व्हायचे. एकदा पतीने पत्नीला घराबाहेर काढले होते. यावेळी अल्पवयीन मुलगी पित्याच्या ताब्यात होती. काही दिवसानंतर वडिलांनी मुलगी कायद्याने सज्ञान होण्याआधीच ३२ वर्षीय तरुणाशी तिचे लग्न ठरवण्याचा घाट घातला. तसेच, मुलगी १८ वर्षांची झाल्यावरोवर १० नोव्हेंबर रोजी घाईने लग्न उरकण्याच्या तयारीत होता. या कटाचा सुगावा लागताच पत्नीने पोलिसांच्या भरोसा सेलकडे तक्रार केली. भरोसा सेलने पत्नीचे माहेर असलेल्या चिखली पोलिस ठाण्यात प्रकरण पाठवले.
याबाबतचे, लेखी आदेश पोहचले नाहीत. त्यामुळे मुलीच्या आईने अॅड. समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाल अॅड. आदिल शेख, अॅड, इरफान उनवाला यांच्यामार्फ मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. अरिफ डॉक्ट आणि सोमशेखर सुदर्शन यांच्या संयुक्त पीठाने भरोस सेलला चार आठवड्यात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले. दरम्यान, लग्न करू पाहणाऱ्या तरुणाने उच्च न्यायालयासमोर व्हर्चुअली उपस्थित राहून कबुली देत हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलत असल्याचे सांगितले. त्यामुळे आईला वाटत असलेल मुलीवरील अरिष्ट टळले.