पुणे : पुण्यातील आयटी कंपनीत अकाऊण्टंट म्हणून काम करणाऱ्या तरुणीची त्याच्या सहकाऱ्याकडूनच सोमवारी (दि.०६) हत्या करण्यात आली होती. इमारतीच्या पार्किंगमध्ये सहकाऱ्याने तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले होते. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना चहूबाजूला अनेक जण उपस्थित होते, मात्र आरोपीच्या हातातील शस्त्र पाहून कोणाचीही त्याच्याजवळ जाण्याची हिंमत झाली नसावी. आरोपीने हातातील शस्त्र खाली टाकताच बघ्यांनी साहस दाखवत त्याला धरलं आणि चांगला चोप दिला. तसेच तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील विमाननगर भागातील डब्ल्यूएनएस आयटी कंपनीत अकाऊण्टंट म्हणून काम करणाऱ्या तरुणाने आपल्याच सहकारी मैत्रिणीवर धारदार चाकूने वार करुन केले. तरुणीला रग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र अति रक्तस्त्रावाने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी संध्याकाळी कंपनीच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज, पुणे) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, कात्रज, पुणे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीत अकाऊण्टंट म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
हत्येचं नेमकं कारण काय?
शुभदाने कृष्णाकडून काही रक्कम उसनवारीने घेतली होती. मात्र, ती पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने दोघांमध्ये वादाचे खटके उडत होते. सोमवारी (दि.०६) संध्याकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. यावेळी कृष्णाने धारदार चाकूने शुभदावर जीवघेणे वार केल्याचे समोर आले. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.