पुणे: पुण्यात फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका गटाने ३९ जणांना १५.७८ लाख रुपयांना गंडा घातला. फसवणूक झालेल्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेतले परंतु कर्ज दिले नाही. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी आशा चौधरी, वैष्णवी कुलकर्णी-पाठक, अनुप सुभेदार, शोधन भावे आणि राजेश कानभास्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक केलेला शोधन भावे हा मुंबईत असल्याचे समजल्यानंतर फसवणूक झालेल्या काही लोकांनी त्याला पकडून आणले. पोलिसांनी उलट भावे याचे अपहरण करुन मारहाण केल्याचा गुन्हा त्या लोकांवर दाखल केला. दरम्यान, पैशांची फसवणूक केल्याबद्दल शोधन भावेसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शोधन भावे, आशा चौधरी, वैष्णवी कुलकर्णी-पाठक, अनुप सुभेदार आणि राजेश कणभास्कर अशी ओळख पटलेल्या आरोपींनी महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन पीडितांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात दोन महिलांना अटक केली आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केकाण या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.