पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या याचिकेच्या अनुषंगाने मुख्य सचिव आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. जी. मेहरे आणि न्या. एस. जी. चपळगावकर यांनी दिला आहे. पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी ठेवली आहे.
खेडकर यांचे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीने खेडकर यांना सुनावणीची संधी न देता एकतर्फी अहवाल तयार करून ३ डिसेंबरला सुनावणी ठेवली होती, असा आक्षेप घेत खेडकर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
तसेच नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात अहिल्यानगर आणि पुणे येथील जिल्हाधिकाऱ्यांऐवजी राज्यातील कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुनावणीचे आदेश देण्याची विनंती खेडकर यांनी केली आहे.