पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम, महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे आबा बागुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. उमेदवारांच्या यादीत ३ अश्विनी कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अश्विनी नितीन कदम या शरद पवार गटाकडून पर्वतीत निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासोबत अश्विनी अनिल कदम यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. तर तिसऱ्या उमेदवाराचे नाव अश्विनी नितीन कदमच असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील बंडखोरी शांत झाली आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये मात्र बंडखोरी शांत झाली नसून काँग्रेसच्या आबा बागुल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीला या मतदार संघातून आपला उमेदवार निवडून आणण्याचे आधीच आव्हान होते. त्यातच आबा बागुल यांच्या बंडखोरीने आघाडीची अडचण वाढली आहे. त्यामुळे लढत जरी तिरंगी होणार असली तरी फायदा मात्र महायुतीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता ३ अश्विनी कदम मैदानात उतरल्याने मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी २०१९ मध्ये ३६,७६७ मतांनी अश्विनी कदम यांचा पराभव केला होता. मात्र, आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीमध्ये पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आबा बागुल प्रयत्नशील होते. पण, पर्वतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडून भाजपने माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे नाराज झाले होते. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. पण, भिमाले यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे माधुरी मिसाळ यांचा मार्ग सुकर झाला असल्याचे बोलले जात आहे.