पुणे : पुण्यातील खडकी येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी स्वत: ला भाई म्हणविणार्या टोळक्याने एका महिला शिक्षकीच्या घरात शिरुन सर्व सामानाची नासधुस करुन नुकसान केल्याची घटना घडली आहे. ही घटना खडकीतील गोपी चाळ येथे फिर्यादी शिक्षक महिलेच्या राहत्या घरी सोमवारी (दि. ०७) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी एका ४२ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आशिष कांगणे (वय-१८, रा. खडकी), गौरव कांगणे (वय- १९), छोटा लोहार (वय-२०), अलोक रोकडे ऊर्फ सोनु (वय-१९), मॅड्या ऊर्फ यश साळवे (वय-२०, रा. खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. फिर्यादी या त्यांच्या घरात ट्युशन घेत होत्या. त्यावेळी आरोपी त्या महिलेच्या घरात शिरले. त्यांनी घरात येऊन तुमचा मुलगा कोठे आहे, असे विचारले.
दरम्यान, आशीष कांगणे याने हातातील लोखंडी रॉडने तसेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने फिर्यादी यांच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करुन त्याची तोडफोड करुन नुकसान केले. तर अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी देखील केली आहे. आम्ही इथले भाई आहे, असे म्हणत दहशत निर्माण केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ करीत आहेत.