पुणे : सांस्कृतिक शहर अशी ख्याती असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जनतेचे रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसानेच घात केला आहे. एका महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. याच पोलीस ठाण्यात महिलेला विवस्त्र करून दोन पुरुष आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेला चौकशीसाठी बोलवून तिला दोन पुरुष आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून विवस्त्र करून अमानुष मारहाण झाल्याच्या आरोप करत शिवसेना शिंदे गटाची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. या प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर कडक कलमे लावून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पुणे शहर महिला प्रमुख पूजा रावेतकर यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्रथम या विरोधात तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र, महिलांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीवर मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, तो सध्या फरार असल्याने त्याच्या पत्नीला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशी दरम्यान दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या तीन वर्षांच्या बाळासमोरच तिला अश्लील शिवीगाळ केली. एवढंच नव्हे तर विवस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला.
पीडित महिलेने या प्रकरणाची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीला दिली. त्यानंतर पुणे शहर महिला प्रमुख पूजा रावेतकर यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंढवा पोलीस स्टेशनचे पुरुष पोलीस कर्मचारी करपे आणि गाडे त्याचबरोबर महिला कर्मचारी बनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर ३५४ दाखल करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आली आहे.