यवत / राहुलकुमार अवचट : यवत व यवत परिसरात मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना तिळगूळ देत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या. यवत परिसरातील विविध भागातील मंदिरात दर्शनासाठी रांगा होत्या.
नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकरसंक्रांत हा यवत परिसरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळीच यवत गावाची ग्रामदेवी असलेल्या श्री महालक्ष्मी मातेला अभिषेक करून पारंपारिक पद्धतीने आकर्षक पूजा करण्यात आली होती. यवत गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ मंदिर व श्री महालक्ष्मी माता मंदिरात दर्शनासाठी महिलांची रांगा होत्या. महिला वर्ग एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाणाची देवाण-घेवाण करत शुभेच्छा देत होत्या. बाजारातही तिळगुळाबरोबर वाणाचे साहित्याची विक्री जोरदार झाली.
बोर-तिळाचे लाडू, सुगडे पूजन एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. तसेच मकरसंक्रांतीसाठी लागणाऱ्या वाण, वस्तुंचे स्टॉल्स मुख्य बाजारपेठेसह स्टेशन रोड, दोरगे वाडी आदी भागात लावण्यात आले होते. हळदी-कुंकुसह विविध वाण खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.