पुणे : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. आज किसान सन्मान दिवस 2024 निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी राज्यातील ग्रामीण भागातील गरीब नागरिकांसाठी चौहान यांनी मोठी घोषणा केली.
देवाभाऊ जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झालेत
शिवराज सिंह चौहान म्हणाले, माझा महाराष्ट्राशी सखोल संबंध आहे. मी महाराष्ट्राचा जावई आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे छोटे भाऊ आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत. तर देवाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शरद पवार कृषी मंत्री असताना 23 हजार बजेट होतं ते आता 1 लाख 27 हजार करोड इतक झाल आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे परंतू शेतीची प्रत पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
महाराष्ट्राला 20 लाख घरे मिळणार
पुढे बोलताना म्हणाले, मी ग्रामविकास मंत्री देखील आहे. प्रत्येक गरिबाकडे स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. यापूर्वी 6 लाखपेक्षा अधिक लोकांना घर मिळाली होती. 13 लाख 29 हजार महाराष्ट्रातील गरिबांना घरे भेटणार आहेत. आता महाराष्ट्राला जवळपास 20 लाख घरे मिळालेली आहेत. पुढील एका वर्षांत ही घर भेटणार आहेत. ज्यांना यापूर्वी घर भेटले नाही, त्या सर्वांना स्वतःचे घर भेटणार आहे. ज्यांच्याकडे 2 चाकी गाडी आहे, त्यांना पण प्रधानमंत्री आवास योजनेतून घर भेटणार आहे, अशी घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही सर्वात मोठी भेट : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती, ते टार्गेट वाढवण्यात आले आहे. अतिरिक्त 13 लाख घरे आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घर देण्याची घोषणा आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे.
पुढे म्हणाले, महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे, कोणत्याही राज्याला आत्तापर्यंत इतक्या संख्येने घरे मिळालेली नाहीत, जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. आवास प्लसमध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आता ही 20 लाख घरे मिळाल्याने अनेकांना घरे मिळणार आहेत, त्याचबरोबर पूर्वी जे निकष होते, त्यातील काही निकष हे शिथील देखील करण्यात आले आहेत, ज्यांची नावे सुटली होती, जे खरे बेघर आहेत, अशा सर्वांना नव्या सर्वेक्षणात घरे देण्यात येणार आहेत, पुढील पाच वर्षांमध्ये सर्व बेघरांना घरे देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.