लोणी काळभोर : गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळे समोरासमोर भिडल्याने लाठी, काठी व दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील टाकेचा माळ परिसरात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या फ्री स्टाईल हाणामारीत चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
तर कदमवाकवस्ती येथील मिरवणुकीदरम्यान पत्र्याचे शेड आडवे आल्याने शाब्दिक बाचाबाची होवून धक्काबुक्की झाली आहे. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मिरवणूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली होती.
लोणी काळभोर येथील सिद्धनाथ व शिवशंभू या दोन मंडळांमध्ये हाणामारी झाली आहे. या दगडफेकी दरम्यान महिलेसह चार जण जखमी झाले असून तिघांची डोकी फुटली असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, वरील चारही मंडळांमधील भांडणे मिटविण्यासाठी राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भांडणे गंभीर स्वरूपाचे झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई व्हावी. अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा गुन्हा दाखल होणार कि नाही? हे देखील पाहणे म्हत्वाच ठरणार आहे.