खडकवासला : गेल्या खूप दिवसांपासून चर्चेत असलेल्या खडकवासला मतदारसंघात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार? या प्रश्न पडले होते परंतु आता याचे उत्तर मिळाले आहे. शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सचिन दोडके यांना शनिवारी एबी फॉर्मही देण्यात आला आहे. भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्याविरोधात गेल्यावेळी सचिन दोडके यांचा निसटता पराभव झाला होता. सद्या मी येतोय अशा आशयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या संदेशाने खडकवासल्यात पुन्हा सचिन दोडके हेच निवडणुकीच्या रिंगणात असणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी खडकवासला मतदारसंघाची बैठक घेतली होती. सचिन दोडके यांना पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी अनेक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यांची मागणी लक्षात घेऊन तसेच निवडून येण्याची क्षमता विचारात घेता सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करून संधी देण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सचिन दोडके हे पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आहेत. गत पंचवार्षिकला पराभव झालेला असला तरीही मतदारसंघात सक्रीय राहून काम करत राहिले. तसेच दोडके यांच्यात पक्षसंघटना बांधणीचे कौशल्य असून मतदारसंघात त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे त्यांच्याच नावावर
आता शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहीत समोर येत आहे.
सचिन दोडके यांचे नाव जाहीर होण्यास उशीर का?
सचिन दोडके यांचे शरद पवार गटाच्या पहिल्याच उमेदवारी यादीत ३६ नंबरला नाव होते पण पक्षातील इतर इच्छुकही जयंत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हजर होते. त्याच दिवशी जर जयंत पाटील यांनी दोडके यांचे नाव जाहीर केले असते तर बंडखोरी होण्याची शक्यता होती. त्यामुळे यादीत नाव असूनही दोडके यांचे नाव जाहीर करण्याचे जयंत पाटील यांनी टाळले होते. शनिवारी अखेर दोडके यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे.