जुन्नर : बालविवाहाला कायद्याने बंदी असतानाही शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील जुन्नर तालुक्यातील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात चक्क एक बालविवाह होत होता. मात्र, वेळीच सुगावा लागल्याने हा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जामसिंग गिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, तालुका संरक्षण अधिकारी भाग्यश्री घाडगे, ग्रामसेवक तथा बालविकास प्रतिबंधक अधिकारी सोमनाथ वायाळ व पोलीसांची मदत घेऊन तातडीने विवाहस्थळी जाऊन बालविवाह थांबविला. या सामूहिक विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती.
या वेळी मुलीच्या शाळेच्या दाखल्याची पाहणी केली असता, त्यावरील जन्मतारखेनुसार मुलीचे वय १५ वर्षे ६ महिने तर मुलाचे वय २४ वर्षे असल्याचे आढळले. मुला-मुलीचे आई-वडील व नातेवाईकांचे समुपदेशन करून कायद्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मुलीचे १८ व मुलाचे २१ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करणार नाही, असा जबाब लिहून घेण्यात आला. बालविवाह रोखण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अनिल केरुरकर व कर्मचारी, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार व कर्मचारी, ग्रामसेवक सोमनाथ वायाळ, तालुका संरक्षण अधिकारी भाग्यश्री घाडगे, पोलीस पाटील प्रिती कवडे यांचे सहकार्य झाले.
बाल विवाह करणे तसेच संबंधित बाल विवाहात सहभागी होणे, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा आहे. बालविवाह झाल्यास या कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. मंगल कार्यालय मालकांनी तसेच पालकांनी जन्मतारखेचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शाळेतील जन्मनोंद या कागदपत्रांचा आधार घेऊन वयाची खात्री करावी. आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास त्वरित चाईल्ड लाईन नंबर १०९८, पोलीस हेल्पलाईन नंबर १०० किंवा पोलीस अधिकारी किंवा महिला बाल विकास विभागास माहिती देऊन प्रशासनाची मदत करावी, अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या (पुणे) वतीने करण्यात आले.