भवानीनगर : शेतीच्या बांधावर सरंक्षिक भिंतीचे बांधकाम करीत असल्याच्या कारणावरून लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करण्याची घटना घडली आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी येथे घडली आहे. याबाबत उमेश वालचंद सपकळ यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शशिकांत निंबाळकर, आकाश मोरे, सूरज मोरे, सुनीता मोरे, हंसराज मोटे, आदित्य मोटे, अनिकेत मोटे, सुजित सूळ, नितीन तरंगे, सुरेखा मोटे या १० जणांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकळवाडी या ठिकाणी आई, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास असून सणसर सपकळवाडी गावच्या हद्दीमध्ये गट नं. ७८८ मध्ये डाळिंबाची बाग आहे. या बागेतून डाळिंबाची चोरी होत असल्याने बागेला मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंत करण्याचे काम सुरू केले होते. यावरून वरील १० जणांनी उमेश सपकळ यांच्यासह त्यांच्या आई सीता, पत्नी कोमल, तसेच दोन मुले चेतनराजे व संभाजीराजे यांना दगड, लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण केली.
या वादामध्ये उमेश सपकळ यांच्या गळ्यातील सोन्याची चेन कोणीतरी ओढून नेली. या हाणामारीत उमेश सपकळ यांच्या डोक्याला व कुटुंबातील इतर सदस्यांनादेखील मार लागला असून ते इंदापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. उमेश सपकळ यांच्या कुटुंबावर यापूर्वी देखील हल्ले झालेले आहेत, असं फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.